Neha Mahajan
Neha Mahajan
My Blog
<< Back to blog list
शोध…
2021-02-27 09:51:28

आज सकाळी जवळच्या एका शाळेतून येणारे राष्ट्रगीताचे सूर कानावर पडले. माझ्या डोळ्यांसमोर आम्ही जीव तोडून मोठय़ांदा शाळेत राष्ट्रगीत म्हणायचो ते आलं. राष्ट्रगीत ऐकताना मला नेहमी काही तरी उत्कट जाणवे. देशासाठी काही तरी केलं पाहिजे, देशाला आपला अभिमान वाटावा वगैरे. सिनेमागृहात राष्ट्रगीत ऐकतानासुद्धा उगाच डोळ्यात पाणी येत असे. एकदा मी कुठे तरी वाचलं होतं की, भारताचं राष्ट्रगीत इतर देशांपेक्षा यासाठी वेगळं आहे की, त्यात कुणा शत्रूविषयी किंवा लढाईविषयी काहीही नसून केवळ भारताच्या सौंदर्याला प्रेमाने न्याहाळणारं हे टागोरांनी रचलेलं प्रेमगीतच आहे जणू. पण राष्ट्रगीत ऐकताना-म्हणताना आपल्या मनात नेमकं काय असतं?

लहानपणापासून सगळ्यांनाच देशाविषयी अभिमान वाटावा असं कुठे तरी शिकवलं जातं. शाळेत साजरे होणारे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या दिवसांत तर स्वदेशाभिमानाचा माहौल असायचाच आमच्या शाळेत. झेंडा फडकवताना सॅल्यूट करणं, अदबीने एका ठिकाणी चुळबुळ न करता उभं राहणं यात देशाविषयी आदर असावा असं शिकवलं जायचं. आमच्या शाळेबाहेर एका ब्लॅकबोर्डवर लिहिलेला ‘आय डोन्ट लव्ह माय कंट्री बीकॉझ इट इज बिग, बट बिकॉझ इट इज माइन.’ असा ‘सुविचार’ आठवतो.

आता वाटतं की, अभिमान, आदर, भक्ती या सगळ्या भावना खरंच मूलभूत, आपण या देशात जन्माला येतो म्हणून असतात का? ‘भारतीय’ असणं म्हणजे काय? या राजकीय-भौगोलिक सीमांमध्ये जन्माला येणं म्हणजे ‘भारतीय’ का?

आज जगात राष्ट्रीयत्वाबद्दल अनेक स्तरांवर वेगळे वाद, मतं, आणि उलाढाली सुरू आहेत. त्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य नागरिकाने ‘राष्ट्रीयत्व’ असं म्हणणं यालादेखील वेगवेगळे अर्थ दिले जाऊ शकतात. माझ्या मनात मात्र आपल्याला ‘माणूस’ म्हणून बघता येण्यासाठी स्त्री, पुरुष, देश या सगळ्या सामाजिक घटकांची माझ्या परीने, एक वैचारिक प्रयोग म्हणून तपासणी करावीशी वाटते. कदाचित या प्रयोगातून मला अनेक गोष्टी माहिती नाहीत, कळत नाहीत असं उघडकीला येईल- पण निदान तेवढं उघडकीला तरी येईल आणि पुढे त्याचं काही तरी करता येईल, करावसं वाटलं तर.
‘भारतीयपणा’ म्हणजे काय या प्रश्नाची पुन्हा चुळबुळ सुरू झाली ती नुकतीच मैत्री झालेल्या आदिमुळे. हा माझा मित्र मुंबईजवळील गोवंडीत पहिली चौदा वर्षे राहिला. त्याचे आई-वडील कॅनडामध्ये शिकत होते, तेव्हाच त्याचा तिथे जन्म झाला. म्हणून त्याचा पासपोर्टही कॅनेडियन झाला. त्याची अकरावीची अ‍ॅडमिशन घेताना त्याच्या आई- वडिलांच्या हे लक्षात आलं. गंमत म्हणजे त्याला इतकी र्वष माहितीच नव्हतं की तो भारतात ‘एनआरआय’ म्हणून राहत होता. मग काही भयानक ‘डिपोर्टेशन’ वगैरे व्हायच्या आत तो परत कॅनडाला गेला. आता तो दहा र्वष तिथे शिक्षणासाठी राहिला आहे.

त्याला भेटल्यावर तीव्रतेने जाणवली ती भारतीय असण्या-नसण्याची गंमत. आम्ही इंग्रजीतून गप्पा मारतो. कारण तो गोवंडीत राहिला असला तरी त्याची आई कानडी आणि बाबा तेलुगु आणि मराठी गमतीदार! त्याच्या कॅनडामधल्या मित्र-मैत्रिणींशी तो जे इंग्रजीत बोलतो, ते मात्र कॅनेडियन अ‍ॅक्सेंटमधलं इंग्रजी. सोळा वर्षांचा असताना तिथे गेल्यामुळे तोही त्या संस्कृतीत मिसळून गेला. मीही अमेरिकेत गेले तेव्हा सोळा वर्षांचीच होते आणि तेव्हा पहिल्यांदाच माझ्यावर स्वत:ची ‘भारतीय’ अशी ओळख करून द्यायची वेळ आली. आदिसुद्धा कॅनडात जन्मून, इतकी वर्षे तिथे राहून, त्याची ओळख ‘भारतीय’ म्हणूनच होते. ओळख कशी का होईना- कॅनडामध्ये तो भारतीय, आणि भारतात कॅनेडियन!

म्हणजे खरं तर त्याचं भारतीय किंवा कॅनेडियन असणं मधे कुठे तरी धूसर होतंच ना? आपण झाडांसारखे एकाच ठिकाणी आयुष्यभर उभे नाही राहत. विचारांची, संस्कृतीची देवाणघेवाण करत मोठे होत राहतो. नवीन भाषा, शिकत, प्रवास करत, स्वप्न बघत, ज्ञान मिळवत राहतो.

तरीसुद्धा आपली ‘ओळख’ कुठल्या देशाच्या सीमेवर अवलंबून नसते. आपल्या वातावरणात त्या देशाच्या अनेक घटकांचे परिणाम असतात आणि म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्याची छापही असते. पण सगळंच बदलत असतं; तर आपणही तितकेच बदलत असतो.

म्हणूनच मला वाटतं, राष्ट्रगीत म्हणत असताना आपल्या देशाबद्दल प्रेम वाटणं वेगळं.. पण केवळ विशिष्ट देशाचे नागरिक आहोत म्हणून त्या देशाबद्दल अभिमान वाटण्याला फार अर्थ नाही. सॉक्रेटीस ग्रीक होता. मग बेथोवेन जर्मन, मायकेल अँजेलो इटालियन, शेक्सपीअर इंग्लिश आणि किशोरी आमोणकर भारतीयया व्यक्तींबद्दल अभिमान वाटतो, असं म्हणणारे आपण तरी कोण?

आपल्या मुळांबद्दल आकर्षण वाटणं वेगळं, आपली मुळं म्हणजे आपल्याला मिळालेला माणूसपणाचा वारसा, त्यात ‘राष्ट्रीयत्वा’ला कितपत अर्थ उरतो कुणास ठाऊक? मला वाटतं; तो तसा ढोबळच असतो.
काही सौंदर्याचे अनुभव (aesthetic experiences) विशिष्ट देश-विदेशाचे असू शकतात. जशी तळेगावची कोथिंबीर, तिचा गर्द हिरवा रंग, गावरान वास इतर देशात नाही. पण मेपलसारखा वृक्षसुद्धा महाराष्ट्रात नाही. माणसांचं तसं नसतं बहुधा. या सौंदर्याच्या अनुभवातून एका विशिष्ट देशाची ओळख भासू शकते. जसं राग-संगीतात जो विलक्षण वेगळेपणा आहे. किंवा प्रत्येक देशाच्या तत्त्ववेत्त्यांमध्ये भाषेच्या वापरात, विचारात एक विशिष्ट रचना असते किंवा इतर कलांमधून जी अनुभूती होते त्यात एका विशिष्ट भौगोलिक ठिकाणी उगम झाला तरी त्यातून मिळणारी वैश्विक प्रचीती आपल्याला जास्त भावते. आपण कधी म्हणू का, की राग यमन भारतीय आहे? तरीपण भारतीयपणा कुठे तरी असतो आणि नसतो. तो नेमका काय?

नेमकं असं काहीच नाही.
शोधत शोधत फिरणंच बरं.

© 2023 Neha Mahajan. All Rights Reserved. Designed by aplap software.