Neha Mahajan
Neha Mahajan
My Blog
<< Back to blog list
एकटी – नेहा महाजन
2021-02-27 09:53:50

सुरूच्या पानांवर पाण्याचे थेंब स्वच्छ स्वप्नांसारखे चमकताहेत. स्वप्नांसारखे सुंदर, आशादायक आणि अस्तित्वाची नव्याने जाणीव करून देणारे. नयनरम्य सकाळच्या अशा लख्ख प्रकाशात एकटीला वेळ मिळणं मला दिलासा देणारं वाटतं.
तो लख्ख प्रकाश म्हणजे उत्कट भावनेचा, विचाराच्या बळाचा, प्रेमाचा आणि समजून घेण्याच्या मनाच्या तयारीचा. मी, माझं मन, माझं शरीर, माझे विचार अशा उन्हात पसरवून ठेवते; शेजारच्या काकू मागच्या टाकीवर चिकाच्या कुरडया पसरवून ठेवतात तशा.
मी माणूस म्हणून जन्म घेतला, अर्थात मी माणूस म्हणून जन्माला आले. माझं त्यात कुठलंही मत विचारात न घेता. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी नवी आहे. प्रत्येक दिवस, निसर्ग, साहित्य, संगीत, राजकारण, धर्म आणि इतर असंख्य गोष्टी ज्या माणूस म्हणून मी अनुभवते; त्या नव्या गोष्टीला चाखून, समजून, प्रश्न विचारून जास्तीत जास्त ती आहे तशी माझ्या आकलनात यावी म्हणून माझा प्रयत्न मला जिवंत असण्याची जाणीव देतो- उन्हात, वाऱ्यात डोलणाऱ्या झाडा-फुलांसारखी.
परवा सिनेमाला एकटीला जावंसं वाटलं. मी गेले. एकच तिकीट विकत घेताना काऊंटर मागच्या माणसाने जरा चमकून बघितलं. एकच तिकीट? मी हसून हो म्हणाले. दोघा-तिघांचे फोन आले सिनेमा सुरू होण्यापूर्वी. त्यांना सांगितलं, मी सिनेमा बघायला आले आहे. ‘एकटी?’, ‘हो’. मला गंमत वाटली. एकटी आल्याचं इतकं आश्चर्य का?
एकदा कॅनडामध्ये असताना एका जंगलात कॅम्पिंग करण्यासाठी म्हणून एका जवळच्या मैत्रिणीबरोबर मी गेले होते. आम्ही आमचा तंबू उभारला आणि त्या सुंदर मेपल वृक्षांच्या जंगलात गडद काळोखात शेकोटी पेटवून बसलो. खूप गप्पाही मारल्या.. माझी मैत्रीण तंबूत काही तरी आणायला गेली तेव्हा अचानक त्या काळोखात विझणाऱ्या शेकटोपाशी एकटं असल्याची सर्वप्रथम भीतीच वाटली. इतका काळोख, शांतता आणि मी एकटी.. या घनदाट जंगलात मला माहीत होतं की माझी मैत्रीण काही वेळातच माझ्याबरोबर असेल. पण तो एकटेपणाचा अनुभव अंगावर काटा आणणारा होता. शांततेची जाणीव करून देणारा.. जंगलातील असंख्य आवाज, काळोख अधिकच गडद करणारी विझणारी शेकोटी आणि काही काळासाठी का होईना माझ्या मैत्रिणीचं माझ्याजवळ नसणं.. ‘एकटं’ असल्याची जाणीव करून देणारं. भीती वाटली सर्वप्रथम, पण क्षणात ती उत्सुकतेत बदलली.
एकटं म्हणजे तरी काय? कारण एकटं म्हणजे स्वत:बरोबरच की! आयुष्य रक्त भिनलेल्या माझ्या स्वत:बरोबर! स्वत:बरोबर संवाद, आपले विचार पडताळून पाहणं, कधी स्वत:वर नाराज, नाखूश असणं असतंच. पण स्वत:बरोबर शांत आणि आनंदात गप्प बसणं किंवा एखादा सिनेमा बघणंसुद्धा किती आनंद देणारं असतं. आयुष्याचं मोल अनुभवून, पचवून त्यात दुसऱ्याला सहभागी करणं हाही एक वेगळा आणि उत्कट आनंद; पण तो स्वत:च एकटीने अनुभवणं हा माझा आवडता माणूसपणाचा प्रत्यय.
कदाचित एकटं असलं की प्रत्येक बारीकसारीक गोष्ट भिंगातून बघितल्याप्रमाणे जाणवते. इंद्रियांच्या जगाची दारं सताड उघडी ठेवून अनेक अनुभव वेगळ्याच अंदाजात डोळ्यांसमोर येतात. मग अशा वेळी वाटतं, ना मी स्त्री आहे, ना मी पुरुष आहे. मी आहे वाटसरू. वाटेचं पिल्लू, वाट शोधत स्वत: वाट होणारं. इतक्या मोठय़ा जगात नंतर असंख्य वाटांमध्ये विरघळून जाणारं..

© 2023 Neha Mahajan. All Rights Reserved. Designed by aplap software.