Neha Mahajan
Neha Mahajan
My Blog
<< Back to blog list
दयाळाची गोष्ट
2021-02-27 09:55:09

आज सूर्यकिरणांनी हळुवार उठवलं. उन्हाळा नक्की निघून गेलाय आणि पाऊस कुठल्याही क्षणी सुरू होईल असं निळं आभाळ माझ्या खिडकीतून दिसतंय. वाऱ्यामुळे पानं अस्वस्थ होऊन सळसळ करताहेत.
मी उठून कॉफी ठेवली आणि बाहेर दयाळाचं घरटं बघायला गेले. आमच्या दारात पितमोहोराचा मोठा वृक्ष आहे. त्यावर माझ्या काकाने बनवलेलं लाकडी (बर्ड हाऊस) खिळ्याने ठोकून लावून घेतलंय. अनेक चिमण्या आणि खारी इथे आनंदात राहून गेले आहेत. पक्ष्यांना आयतं घर जरी मिळत असलं, तरी प्रत्येक पक्षी आपल्या आवडीच्या गवताची बैठक करतोच आतमध्ये. मध्ये एक दयाळाचं जोडपंसुद्धा राहून गेलं या घरात. आम्ही त्यांना मिस्टर आणि मिसेस दयाळ म्हणायचो. कित्येक वेळा आई सहजपणे म्हणत – जा, मिसेस दयाळसाठी पाणी ठेव आपल्या लाकडी वाटीत.
आम्ही जिथे जेवायला बसतो, त्या टेबलावरून खिडकीच्या बाहेरची बाग दिसते. त्याबरोबर ते घरंपण. खारी आणि कावळ्यांची भांडणं मी अनेकदा जेवताना पाहिली आहेत.
त्या पक्ष्यांचं नियमित उठणं, भिरभिरत खाणं शोधणं, मनसोक्त गाणं आणि दुपारी शांतपणे फांदीवर बसून एकटक आकाशाकडे बघत राहणं मला अनुभवायला आवडतं. मुंबईहून घरी आल्यावर मला हे पक्षी भेटले की जवळचे मित्र-मैत्रिणी भेटल्यासारखा आनंद होतो. चहा पित मी त्यांच्या आयुष्याची चौकशी करत असते. ते खूप व्यग्र आहोत अशा थाटात त्यांचं त्यांचं जगत असतात. पिवळे धोबी व छोटेसे सूर्यक्षी त्यांच्या इवल्याशा चोचीत मोठ्ठी आळी घेऊन जाताना बघायला मजा वाटते.
दयाळ मात्र नियमित दिसणाऱ्या पक्ष्यांपैकी एक. पराग काका म्हणजे पराग महाजन, माझा काका – जो डॉक्टर आहे पण त्याहीपेक्षा प्राणी, पक्षी, झाडं ह्यंच्यावर त्याचं मनापासून प्रेम आहे. त्याची बियॉण्ड वाइल्ड नावाची संस्थासुद्धा आहे पुण्यात. तर पराग काकाने मला एकदा सांगितलं की दयाळ हा शब्द हिंदी कथा दहीयाळवरून आला. गुळगुळीत काळ्या पंखांवर दह्यचे शिंतोडे उडाल्यासारखे त्याचे सुंदर काळे- पांढरे पंख दिसतात- म्हणून दहीयाळ. Carl linnaeus (कार्ल लिनिए) नावाच्या एका दिग्गज वनस्पतीशास्त्रज्ञाने मग दयाळवरून ‘dial’ हा इंग्रजी शब्द शोधला. आणि दयाळाचं इंग्रजी नामकरण करण्यात आलं. ‘solaris’ त्याच्या ‘sun-dial’ या अर्थावरून. मात्र लिहिताना काहीतरी गोंधळ झाला आणि त्याने solaris च्या ऐवजी saularis असं लिहिलं. आता पुन्हा हिंदी भाषिक लोकांनी त्याचा वेगळा अर्थ लावला. ‘सौ लहरी’वरून आलं असणार ‘salauris’ आणि सौ लहरी म्हणजे शंभर सूर! म्हणजे असा शंभर गाणी गाणारा हा दयाळ!
आमच्याकडच्या मिसेस दयाळांना मी तिच्या पिल्लाला खाऊ घालताना बघितल्याचं आठवतं. मागच्या चिक्कूच्या झाडाखाली आईने सेंद्रिय खत करण्यासाठी दोन मोठे ड्रम ठेवले आहेत. तिथे बऱ्याच छोटय़ा अळ्या आणि किडे सापडतात. म्हणजे दयाळांची मेजवानीच. मिसेस दयाळ छोटय़ा-छोटय़ा उडय़ा मारत अळीची शिकार करत आणि क्षणभर अळी चोचीत ठेवून उडय़ा मारत पिल्लाकडे जात. अळीची चुळबुळ थोडी कमी झाली की किंचाळत लाल तोंडाचा मोठ्ठा ‘आ’ करून बसलेल्या पिल्लाच्या तोंडात ती अळी ठेवत.
मि. दयाळ मात्र जास्वंदीच्या फांदीवर बसून गाणी म्हणतात. रियाज करताना एकदा- दोनदा मिस्टर दयाळांनी साथसुद्धा केली आहे मला.
घरात पाहुणे आले की आम्ही आवर्जून ओळख करून देतो. हे आमचे मिस्टर आणि मिसेस दयाळ. मागे एक जांभळाचे झाड आहे. थोडीशी जांभळं आपल्यासाठी आणि बाकी सगळी पक्ष्यांसाठी असा विचार करूनच लावलेलं ते झाड. आंब्याच्या झाडावर बसलेला कोकीळ तर जीव ओतून कमालीच्या चिकाटीने गाणं म्हणत बसतो. आमची भांडणंसुद्धा होतात कधी कधी. मी ओरडून रागावते त्याला- अरे गप्प बैस जरा वेळ, यायचं असतं तिला तर आली असती एव्हाना. मला शांतपणे काम करू दे माझं! मग बाबा त्याची बाजू घेऊन मला ओरडत- त्याच्याशी भांडू नकोस उगाच! असे आमचे लाडावलेले आणि लाडके घरचे पक्षी.
गेले काही दिवस पुन्हा एका दयाळीणीने पिल्लं दिली त्या लाकडी घरात. बरेच दिवस त्यांच्या स्वागताची तयारी सुरू होती. पिल्लांचं पोट भरण्यासाठी तिचे कष्टही वाढले होते.
मला खूप वेळा मनात येऊन जातं की किती मऊ स्पर्श असेल तिच्या सुंदर दही उडवलेल्या काळ्या पंखांचा. मग मी गवतावरून हात फिरवते आणि कल्पना करते की असाच असेल काहीसा तो स्पर्श. Amelie नावाचा एक फ्रेंच चित्रपट आहे- ज्यात ह्य स्पर्शाचं आकर्षण असलेली ती अभिनेत्री आहे. वाण्याच्या दुकानात गेलं की तांदळाच्या पोत्यात बोटं खुपसणं तिला खूप आवडतं. मलाही खूप आवडतं. गाईच्या जिभेचा खरखरीतपणा, कणीक मळतानाचा चिकट-घट्टपणा, आई-बाबांच्या वापरलेल्या कपडय़ांचा मऊपणा आणि आता लिहिताना जाणवतंय की माझ्या मित्र-मैत्रिणी आणि जवळच्या लोकांच्या कोपरांचा स्पर्श मला खूप आवडतो- कधी तो खरखरीत असतो, पण काही लोकांचा इतका मऊ आणि गुळगुळीत! असो.
आज मी उठले आणि कॉफी घेऊन बाहेर गेले. दयाळ तिच्या नेहमीच्या जागेवर नव्हती. पिल्लासाठी खाऊ शोधत असेल. येईलच थोडय़ा वेळात म्हणून मी बागेत खुर्ची टाकून बसले. कॉफीचा घोट घेतल्यावर मला एक छोटासा फिक्या करडय़ा रंगाचा पंख गुलाबाच्या झाडात अडकलेला दिसला. मी थोडी जवळ गेले आणि पाहिलं तर खूप सारे पंख विखरून पडले होते गुलाबापाशी. काळे गुळगुळीत, काही दह्याचे शिंतोडे उडलेले काळे-पांढरे.. हे नक्की दयाळीचेच पंख. पण ते असे विखरून का पडलेत? परत घरटय़ाकडे बघितलं – काहीच हालचाल दिसेना. कुठे गेले सगळे? मी ते पंख वेचले आणि एकदाचा दयाळाच्या पंखांचा स्पर्श अनुभवला. पण असा? असा नव्हता अनुभवयाचा मला तो स्पर्श. येईल ना ती परत?

© 2023 Neha Mahajan. All Rights Reserved. Designed by aplap software.