Neha Mahajan
Neha Mahajan
My Blog
<< Back to blog list
सगुणा – नेहा महाजन
2021-02-27 09:48:20

गेले काही दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमच्या घरासमोरची जमीन खोदण्याचं काम सुरू आहे. एरवी शांत असलेला परिसर आता त्या खोदण्याऱ्याच्या खडखडात बुडून गेला आहे. एका मोठय़ा बिल्डरने तिथे दोनशे फ्लॅट्सची अपार्टमेंट स्कीम बांधण्याचं काम जोराने सुरू केलं आहे.

दरवर्षी हिवाळ्यात अगदी गेल्याच हिवाळ्यापर्यंत त्याच जमिनीवरून मंद वास यायचा तो मेंढपाळांच्या झोपडीतून येणाऱ्या धुराचा. सकाळ झाली की चूल पेटवून भाकरी, चहा आणि थंडीचा एकत्रित वास त्या धुरातून आमच्या खिडकीपर्यंत यायचा. गेली कित्येक र्वष हे मेंढपाळ तिथे येऊन राहायचे. त्याच भागात एक लहानसं तळं होतं. पावसाळ्यात तिथे असंख्य बेडूक आरडाओरडा करायचे आणि इतर वेळी खूप पक्षीही बघायला मिळायचे. पाणकावळे आपले पंख पसरून उन्हात वाळवताना बसत तेव्हा मीही सूर्याकडे बघत केस मोकळे सोडायचे. आमचा मोती त्यात पोहायचा आणि एक-दोनदा आम्हीही त्यात उडी मारल्याचं आठवतं. मेंढपाळांसाठी ती उत्तम जागा होती. पाण्याचा साठा, मोकळी जमीन आणि जवळच भरपूर गवताचे मळे.

दोन-चार गाढवांच्या आणि खेचरांच्या पाठीवर मावेल इतकं मोजकंच सामान त्या मेंढपाळांकडे असायचं. त्यांची झोपडी म्हणजे चार बांबूंनी बांधलेली त्यावर लांब प्लास्टिकचे शीट्स, नारळाच्या पानांनी आणि गवतांने भक्कम केलेली. सकाळी साधारण शंभर एक मेंढय़ा चरायला जात. त्यांच्याबरोबर अतिशय सुंदर, उभ्या कानांची रानटी कुत्री, त्यांची देखभाल करायला आणि गुलाबी फेटा बांधून, सुंदर साडय़ा नेसून जाणारे त्यांच्याबरोबरचे त्यांचे मालक आणि मालकीण एकदा सहज मी त्यांच्या झोपडीजवळ गेले. तसं लेंडय़ांचं खत घ्यायला वगैरे अनेकदा जायची वेळ आलीच होती. तिथे गेले तर एक अतिशय सुंदर, २३-२४ वर्षांची मुलगी मोकळ्या मैदानात एका फरशीवर गरम पाण्याने आंघोळ करत होती. मला बघून कुतूहलाने हसली आणि तसंच आंघोळ आटपून साडी नेसतच मला विचारलं, ‘‘काय गं?’’

तिचं असं सहज, शरीराबद्दल कुठलाच संकोच न बाळगता नैसर्गिक मोकळेपणाने माझ्याबरोबर असण्यामुळे, मीही आरामात गप्पा मारू लागले. तिचं आयुष्य कसं आहे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते. तिनेही मला माझं नाव चिारलं. मी नेहा असं माझं साधंसुधं नाव सांगितल्यावर तिने ‘‘होय’’ असं उगाच कौतुकानं म्हटलं. तिचं नाव होतं सगुणा. तिची बहीण जाईबाईसुद्धा गप्पा मारायला आली आणि हसत-लाजत आम्ही बराच वेळ एकमेकींचं इतकं वेगळं आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. सगुणा आणि जाईबाई दिसायला अतिशय सुंदर, कणखर, बारीक आणि निरागस होत्या. त्यांच्यात निसर्गाच्या इतक्या जवळ असल्यामुळे एक नैसर्गिक प्रखर रानटीपणा होता. देखणा, सहसा मेकअप आणि डिझायनर कपडय़ांमध्ये बघायला न मिळणारा.

त्यांच्याशी बोलून जाणवली ती त्यांच्या आयुष्यात मोकळ्या जमिनीबद्दल असणारी कृतज्ञतेची भावना. काहीच दिवस तिथे राहून, त्यांचं घर तिथे बनवून, पुन्हा काही दिवसांनी दुसरी जमीन भटकत शोधायची. अशी जमीन मिळाल्यावर प्रत्यक्ष कृती करून घर बांधायचं, जमीन आपलीशी करायची अणि सोडून जाताना पुन्हा स्वच्छ करून होती तशी ठेवायची. मेंढय़ांच्या यकृताला त्रास होऊ नये म्हणून कुठलंसं विशिष्ट गवत असतं. त्या गवताला नमस्कार करून जमीन सोडून द्यायची. सगुणाने मला तिने केलेल्या मण्यांची-धाग्यांची माळ दाखवली होती. आपण जगतो, घालतो ते दागिने हे सगळे असे हाताने तयार केलेले पाहून मला हेवा वाटला-त्यांच्या या नैसर्गिक विकाऊ नसण्याऱ्या आयुष्याचा.

ह्य अपार्टमेंट स्कीमचा मार्केटिंगचा माणूस आमच्याकडे आला आणि तिथले फ्लॅट्स कसे आधुनिक आणि उत्कृष्ट आहेत सांगू लागला-फिरायला बाग, मोठी पार्किंगसाठी जागा, एक छोटं व्यायामघर, सुंदर इंटेरियर्स वगैरे वगैरे. माझ्या डोळ्यांसमोर मेंढय़ांमागे पळणारी सगुणा आली आणि एकदम पाणीच आलं डोळ्यांत. तळं बुजवून इतक्या मोठय़ा बििल्डग्स बांधणं काळाची गरज असावी, पण त्या तळ्याबरोबर आणखीन काहीसुद्धा बुजवलं जातंय का? निसर्गाच्या अगदी जवळच सगुणाचं अस्तित्व आणि मोठी पार्किंग स्पेस मिळाल्यावर आनंदी होणारे आपण यात किती मोठे अंतर आहे ना?

त्याच मैदानात कृष्णा नावाच्या मुलाचं छोटं घर होतं. त्याच्याकडे कबुतरं आणि काही गाई-म्हशी होत्या. तो शेण्याच्या गौऱ्या थापत आम्हाला कहाण्या सांगायचा. त्याला म्हणे पक्ष्यांची भाषा कळायची. मी ‘हॅह!’ असं एकदा म्हणले तर त्याने शीळ वाजवून एका पिवळ्या पक्ष्याला बोलावलं. तो आलाही! मी आणि आमची लहानपणीची गँग आश्चर्यचकित होऊन बघत राहिलो. कृष्णा मला खूप आवडायचा. नंतर कुठे गेला कुणास ठाऊक!
मला खात्री आहे अजून पक्ष्यांच्यात रमून गाईचं दूध काढून गाणी म्हणत असेल कृष्णा आणि सगुणा. जाईबाई मोकळं रान शोधत फिरत असतील. आणि मीही जपून ठेवीन त्यांची आठवण खिडकीबाहेर दोनशे फ्लॅटस्ची अपार्टमेंट स्कीम दिसू लागली तरी.

© 2023 Neha Mahajan. All Rights Reserved. Designed by aplap software.