Neha Mahajan
Neha Mahajan
My Blog
<< Back to blog list
मिठू
2021-02-27 09:53:19

बाबांच्या फॅक्टरीतले एक कामगार- वामन काका एके दिवशी घरी आले. मी नुकतीच शाळेतून घरी आले होते आणि हात-पाय धुऊन बाहेर येताच वामन काका दिसले. त्यांच्या मोठय़ा, कामाने खरखरीत झालेल्या हातात एक पोपट बसला होता. त्याला बघून मी खूप खूश झाले. वामन काकांनी तो माझ्यासाठीच आणला होता. ‘स्िंलग’ ही फॅक्टरी घरचीच असल्यामुळे माझं आणि तिकडच्या कामगारांचं नेहमीच एक गोड नातं होतं. ते मला कडेवर घ्यायचे, झाडाचे आंबे, पेरू, डब्यातली चटणी वगैरे द्यायचे. पण पोपट! मी खूप खूप खूश झाले.
वामन काकांच्या हातातून पोपट माझ्या बोटावर उतरला. त्याचा एक डोळा गेला होता आणि त्याचे पंखही कोणीतरी कापले होते. वामन काकांना तो त्यांच्या बागेत सापडला होता. त्याचं नाव ‘मिठू’ पडलं आणि माझा सहावीत असतानाचा तो सगळ्यात घट्ट मित्र झाला. एका मित्राच्या घरून त्याच्यासाठी पिंजरापण आणला होता, पण आमचा मिठू उडूच शकत नसल्यामुळे आम्ही त्याला पिंजऱ्यात ठेवायचेच नाही. तो माझ्या खांद्यावर असे. सतत खांद्यावर नाही, तर बोटावर. बोटावर नाही तर मी असेन त्या खुर्चीत. नाहीतर माझ्या अगदी शेजारी. मला कधी कसलं रडू आलं तर मी मिठूला जवळ घेऊन आरशासमोर रडायचे. आरशासमोर रडताना पुसटसं बहुधा वाटलं असणार मला, की मोठं झाल्यावर अभिनेत्री व्हायचं.
मिठू माझं जग होता. त्याचं हळूहळू एका डोळ्याने मिर्ची खाणं, ‘‘मिठू!’’ अशी हाक मारली की मान तिरकी करणं, बाबांची सतार ऐकत उगाच आरडाओरडा करणं, माझ्याच खांद्यावर हक्काने आणि प्रेमाने बसणं मला खूप आवडायचं. त्याच्या पायाच्या नखांनी माझ्या हातावर इतके ओरबाडे झालेले असायचे, पण शाळेत गेल्यावर मिठूची आठवण माझ्या हातावरच्या ओरखडय़ांनी जपली जायची.
मला तर अभिमान वाटायचा त्याचा. एक छोटासा पोपट माझ्यावर किती विश्वास टाकतो. त्याच्या छोटय़ा हिरव्या मऊ डोक्यावरून अलगद हात फिरवला की त्याचा एक डोळा आनंदानं मिटायचा.
आमच्या कॉलनीतले सगळे कुत्रे आमच्या मित्र- मैत्रिणींच्या ‘गँग’मधले होते. का आता आठवत नाही, पण एका कुत्रीचं नाव आम्ही ‘वेलणकर’ ठेवलं होतं. वेलणकर गेली तेव्हा माझ्या अभिराम नावाच्या मित्राला सगळ्यात दु:ख झाल्याचं आठवतं. त्याची लाडकी होती ती. त्याच्याच घरामागे पुरलं आम्ही तिला. तर ह्या आमच्या ‘गँग’नी मिठूचा एक वाढदिवसही साजरा केल्याचं आठवतं. सुमितनं तर मिठूसाठी गिफ्ट म्हणून लाल मिरचीपण आणली होती. आमच्यापेक्षा वयाने थोडा मोठा आणि तसा आम्हाला फार न आवडणारा एक मुलगा होता. त्याला रडून रडून सांगितलं तरी तो गिलवरीनं छोटय़ा चिमण्या मारायचा. मग मला खूपच दु:ख व्हायचं आणि आमच्या बदामाच्या झाडाखाली मी त्यांना व्यवस्थित खड्डा करून पुरून टाकायचे, एक मोगऱ्याचं फूल ठेवून द्यायचे. पण मिठू ह्यचाही लाडका होता.
एकदा शाळेतून घरी येताना दादाचा मित्र भेटला. दादा सेकंडरी शाळेत असल्यामुळे माझी शाळा सुटली की मग त्याची भरायची. तो मला म्हणाला, ‘‘तुला कळलं का? तुझा मिठू गेला. त्याला मांजराने मारलं.’’ माझ्या आयुष्यातलं ते सर्वात घाबरवून टाकणारं वाक्य होतं. त्याचा आवाज आत्ता लिहितानाही आठवतो. मी ढसाढसा रडायलाच लागले. दादा मागून सायकलीवर येत होता. मला रडताना बघून मित्रालाच रागवला. कशीबशी माझी समजूत काढली त्याने आणि मी रडत रडतच घरी परतले.
माझ्या आयुष्यात आजही मिठूच्या नसण्याची पोकळी आहे. त्याच्या असणाऱ्या आठवणींनी भरलेली हळूहळू आयुष्यातून अशा अचानक निघून जाणाऱ्यांची संख्या वाढतच गेली. कोणी असा अचानक निघून गेला की काळजाला मोठ्ठी चीर गेल्यासारखंच वाटतं.
पण आज सकाळी पाऊस थांबल्यावर बागेत गेले तेव्हा एक गुलाबाची कळी दिसली. नेहमी कळीखाली असलेल्या हिरव्या छोटय़ा पाकळ्यांनी अजून गुलाबाच्या लाल पाकळ्या घट्ट आत चंबू करून धरलेल्या. एक छोटीशी चीर ह्य पाकळ्यांनाही गेलेली. त्या गुलाबाची कळी आत्ता रात्रीपर्यंत पूर्ण उमललेली होती. मला वाटलं, आपल्या आयुष्यातली दु:खं ह्य हिरव्या पाकळ्यामधल्या चिरेसारखीच तर असतात!
चीर वाटे-वाटेपर्यंत आयुष्याबद्दल वेगळं काहीतरी उजमत जातं- आपलंच आयुष्य फुलत असतं. त्या गुलाबाच्या कळीसारखं.

© 2021 Neha Mahajan. All Rights Reserved. Designed by aplap software.