Neha Mahajan
Neha Mahajan
My Blog
<< Back to blog list
माझ्या दोन शाळा – नेहा महाजन
2021-02-27 09:54:26

मी सोळा वर्षांची असताना पहिल्यांदा अमेरिकेत गेले. त्याआधी दहावीपर्यंत तळेगावच्या बालविकास विद्यालयात शिकले. सकाळी लवकर तयार होऊन ओढय़ाच्या रस्त्याने फुलपाखरांमागे पळत मी आणि दादा शाळेत जायचो. बाबा आम्हाला सोडायला यायचे. बाबाही शिट्टी वाजवत, गात पुढे चालत. कधी कधी मी आणि दादा जोरात पळत पुढे जाऊन पुन्हा मागे बाबांकडे येत असू. थोडं मोठं झाल्यावर आजोबा त्यांच्या कायनेटिकवर सोडायला येत. माझे आजोबा कविता करायचे. एकदा पावसाळ्यात आजोबा मारुती व्हॅनने सोडायला आले. मी दप्तर घेऊन बाहेर आले आणि घराकडे बघत आजोबांना म्हणाले, ‘‘आपण घरासाठी एक मोठ्ठी छत्री करायची का पावसाळ्यात?’’ आजोबांना इतकं आवडलं होतं ते, की कौतुकाने अनेक लोकांना, डोळ्यात पाणी येऊन ते हा प्रसंग सांगत. मी आणि दादा मात्र आजोबांची नक्कल करत असू. ओठ हालवत डोळ्यात पाणी येऊन आजोबा कोणाला तरी किरकोळ प्रसंग सांगताहेत याची गंमत वाटायची. आमची शाळेत जातानाची मन:स्थिती आनंदी आणि उत्साही ठेवण्यासाठी किती सुंदर क्षण निर्माण होत असत.
आमची शाळा छोटी आणि साधी होती. आमच्या गावातील दोन इंग्रजी शाळांमधली आमची पहिली! आम्ही मुलं-मुली आठवीपर्यंत एकत्र बसायचो. शिक्षकांबरोबर खूप मोकळीक असायची. चप्पल वर्गात सोडून धुळीत खेळणंसुद्धा चालायचं.
वर्गात कोणाचं कोणावर प्रेम जडलं तर त्यांना खूप त्रास द्यायचो. सतत चिडवणं, कोणी दोघं चुकून नजरानजरी करताना पकडले गेले तर अख्खा वर्ग कितीतरी वेळ आरडाओरडा करायचा. मलाही एक मुलगा आवडायचा आणि त्याला मी. मी शाळेची व्हाइस कॅप्टन होते. माझं काम असायचं प्रत्येक वर्गात खडू पोहोचवणं. एकदा त्याच्या वर्गात मी गेले तेव्हा फक्त लाल आणि निळे खडू ठेवले, कारण मी ‘ब्ल्यू हाउस’ आणि तो ‘रेड हाउस’मध्ये होता. त्याला कळलं होतं बहुतेक. खडू बघून तो हसला होता. आम्ही कधीच फार एकमेकांशी बोललो नाही.
अकरावीत मी एकदम अमेरिकेच्या शाळेत! अकरावीसाठी फग्र्युसन कॉलेजमध्ये गेले आणि अमेरिकन फिल्ड सव्‍‌र्हिसची शिष्यवृत्ती मिळाली. एक वर्ष अमेरिकेत शिकायला निघालेले. आईने माझ्यासाठी ‘एट हिअर लिआर्टस’ हा पोलोनिअसने लिआर्टसला ‘हॅम्लेट’ या नाटकामध्ये केलेला सुंदर उपदेश मराठीत भाषांतर करून दिला होता. वाचून दाखवताना रडलीही होती. माझ्या दादाच्या डोळ्यात पाणी पाहिल्यावर वेगळंच वाटलं होतं. माझ्याबरोबर खेळणारा, मज्जा करणारा, भांडणारा दादा मी जाणार म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी! मी खरंतर इतकी उत्साहात होते की जेव्हा खरंच विमानतळावर मला आई, बाबा, दादा काचेतून टाटा करताना दिसले, तेव्हा मला अचानक रडू फुटलं होतं. तोपर्यंत कुठेतरी लांब जाण्याच्या आनंदात होते.
माझी टेक्सासमधल्या शाळेत गेल्यावर हॅरी पॉटरच्या हॉगवर्ट्स शाळेची आठवण झाली होती. उंच सुंदर भव्य विटकरी इमारत, खूप मोठय़ा पायऱ्या, लांब कॉरिडोर्स, मोठ्ठी लायब्ररी, हुशार, सुंदर, प्रेमळ शिक्षक.
एक नवीन जग माझ्यासाठी उघडलं गेलं. पहिल्यांदाच जेव्हा पायरीवर बसून एका माझ्याच वर्गातल्या जोडप्याला मिठीत बिनधास्तपणे चुंबन घेताना पाहिलं तेव्हा प्रथम धक्का बसला. पण हसूही आलं. की आमच्या शाळेत या दोघांना किती भीती वाटली असती. इतके दिवस ‘मोकळीक’ या शब्दाचा विचार केलाच नव्हता. असो. तुम्हाला वाटतील ते कपडे घाला, वाटेल त्याच्याशी मैत्री करा, पण अभ्यास आणि वर्गकामाच्या बाबतीत चोख राहा. असं धोरण होतं माझ्या ट्रिम्बल टेक हाय स्कूलमध्ये. मिस्टर स्लोन हे माझे इंग्रजी साहित्याचे शिक्षक इतक्या मनापासून शिकवायचे! हॅम्लेट वाचताना कधी भावनेच्या भरात हॅम्लेटचे वडील येतात त्या सीनमध्ये एकदम टेबलावर उभे राहायचे आणि भुताच्या आवाजात बोलू लागायचे. त्यांनी मला खूप पुस्तकं दिली वाचायला. त्या वर्षांत मी खूप शिकले. नाटय़शास्त्र हा माझा मुख्य विषय असल्यामुळे शाळा संपल्यावरसुद्धा एक-दोन तास आमचा नाटकाचा वर्ग रंगमंचावर रेंगाळायला जायचा. आम्ही स्वप्न पाहायचो एकत्र. प्रत्येकाला वाटायचं रंगभूमीतला फॅण्टम आपल्याला आशीर्वाद देतोय. आमच्या शाळेत अशी समजूत होती की या प्रेक्षागृहात एक फॅण्टम राहायचा, जो सगळ्या अस्वस्थ आत्म्यांना शब्द द्यायला मदत करायचा आणि प्रयोग चांगला झाला तर ती त्याचीच कृपा. फॅण्टम रंगमंचावरून मला अ‍ॅण्टीगॉनचा मोनोलॉग म्हणताना वाटायचं मी थेट त्या फॅण्टमच्या डोळ्यात बघतेय. त्या शाळेत मी एकटीच भारतीय मुलगी होते. त्यामुळे मला मस्त भूमिका मिळायच्या. थोडेसे विचित्र ब्लिथ स्पिरीटमधल्या मादाम आर्कटीसारखे. माझे उच्चार सगळ्यांपेक्षा वेगळे होते. आमच्या मिस पेन्टटनी मला उच्चार कसा करायचा याचं प्रशिक्षण दिलं.
माझ्या दोन्ही शाळा एकमेकांपेक्षा वेगळ्या होत्या. दोन्हीमधलं सौंदर्य वेगळं! दोघांच्या आठवणींचा सुवास एका वेगळ्या जगाची अनुभूती देणारा. दोन्ही शाळेतले शिक्षक आपल्या विषयावर आणि विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे. काही अपवाद अर्थातच आहेत. पण मिळालेल्या अनुभवात हे अपवाद मिळालेल्याचे मोल करण्याची आठवण करून देणारे- हृदय तोडून टाकणारे नाहीत. तळेगावच्या शाळेतला मैदानातला मोठा शिशिराचा वृक्ष, स्वच्छ खिडकीतून येणारी हवा, खो खो खेळताना तुडवली जाणारी सोनेरी धूळ, डबा उघडल्यावर एखाद्याच्या डब्यातल्या बटाटय़ाच्या घमघमाट – आणि टेक्सासमधल्या भव्य वातानुकूलित वर्गामधला मंद पुस्तकांचा वास, लाकडी बेंचवर ठेवलेला चकचकीत स्वच्छ लॅपटॉप आणि वर्गातल्या खिडकीतून दिसणारे स्वच्छ गवत, नीटनेटके रस्ते, शिस्त आणि वेळ या गोष्टींवर अपार श्रद्धा असलेले माझे नाटकाच्या वर्गातले शिक्षक, मित्र, मैत्रिणी.. या दोन्ही शाळांनी माझं जग किती खुलं केलं माझ्यासाठी. दोन्ही जगांत पूर्णपणे समरसून जगण्यासाठी एकच आयुष्य जरा कमीच पडतंय असं वाटतं!

© 2023 Neha Mahajan. All Rights Reserved. Designed by aplap software.